Friday, August 17, 2012

॥ श्री वैजनाथ स्तुती ॥

          आमच्या ती.आईचे माहेर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरसई  येथले... तेथील पूर्वापार प्रसिद्ध  असे 'श्री वैजनाथ' हे या गावातील सर्वांचेच  प्रिय दैवत आहे. 
 ती. आईने अलिकडेच लिहिलेली श्री वैजनाथाचे यथायोग्य वर्णन करणारी भक्तीपर रचना  -

 ॥  श्री वैजनाथ स्तुती ॥

      श्री वैजनाथस्वामी माझा ।
      आहे वरसईचा राजा  ॥धृ॥

याच वरसईच्या मातीत  ।  आम्ही खेळलो वाढलो ।।
याच देवाच्या छायेत  । आम्ही जगी वावरलो  ॥
कुठे जरी फिरलो , भ्रमलो  । लक्ष त्याचे आम्हावरी  ॥१॥  वैजनाथस्वामी...

बाळपणी सन्निध होतो  । दिन रात दर्शन घेत  ।।
याच देवाच्या आधारे  । मनोमनी निर्भय होत  ॥
वैजनाथ आहे अमुचा  । मनोमनी हा विश्वास  ॥२॥   वैजनाथस्वामी......

किती एक मोठे झाले  । देशी , विदेशी पांगले  ।।
सन्मान्य पदीं पोचले  । नाही देवा विसरले  ॥
महाशिवरात्री दिनी  । धांव घेती तुज चरणी  ॥३॥   वैजनाथस्वामी......

वैजनाथ देव माझा  । उंच देऊळ डोंगरी  ।।
पाय-या त्या चढूनी जाता  । शुद्ध हवा गमते भारी  ॥
देव सभोती अनेक  । नंदी आहे त्या समोरी  ॥४॥   वैजनाथस्वामी......

ह्याच देवाच्या पायाशी  । नदी बाळगंगा खाशी  ।।
नित्य तुझ्या पदस्पर्शाने  । धन्य पावते मानसी  ॥
निर्मळ त्या जलस्पर्शाने  । करी पांवन गावांसि  ॥५॥   वैजनाथस्वामी......

उंच कळस दुरुनी दिसतो  । हृदय उचंबळूनी येत  ।।
श्रांत मना शांतवित  । नतमस्तक होते त्वरीत  ॥
हाच अंतरीचा ठेवा  । जपूनी ठेवते मानसी  ॥६॥   वैजनाथस्वामी......

आम्ही माहेरवाशिणी  । नित्य ध्यातो तुजस्मरणी  ।।
जरी संसारी रमलो  । लक्ष राहे तुजचरणी  ॥
भवसागरी या तरलो  । नेई तुझ्या रे पायांसि  ॥७॥   वैजनाथस्वामी......

                                                                               
                                                      --  श्रीमती रेखा भालचंद्र साठे
                                             ( वत्सला जोशी )Thursday, November 12, 2009

श्लोक ४० ते ४३....

ऐशा प्रकारे वांग्मयरुपानं I श्रीमत्शंकर पुजून I
चरणकमळी सेवा केली अर्पून I तो संतुष्ट होवो मजवरी ...II४०II

हे महेश्वरा तुझे रुप जाणत नसे मी नित्य खास I
जैसा अससि तु तैशास I नमस्कारीतो सर्वथा.....II४१II

जो मनुष्य हे स्तोत्र एकदा I अथवा पठण करी दोनदा I
किंवा त्रिकाळ पढितो सर्वदा I शिवलोकी होई आदरिता ....II४२II

ऐसे हे पुष्पदंतोत्पन्न स्तोत्र I पापनाश करी सर्वत्र I
पठण करिता अहोरात्र I प्रसन्न होतो महेश्वर ....II४३II

इतिश्री पुष्पदंतविरचितं श्रीशिवमहिम्नस्तोत्रं संपूर्णम II
श्रीसांबशिवार्पणमस्तु, श्रीरस्तु, शुभंभवतु II
II ॐ नम: शिवाय II

Wednesday, November 4, 2009

श्लोक ३७ ते ३९

चंद्रमौळी देवाधिदेवांचा सेवक I पुष्पदंत नामे गंधर्व एक I
शंकररोषे झाला अघिकारभ्रष्ट I तेणे हे स्तोत्र गाईले .....II३७II

देव, मुनी यांना मान्य झालेले I स्वर्गमोक्षाचे साधन बनलेले I
ऐसे हे पुष्पदंताने स्तोत्र रचिले I अमोघ आहे सर्वथा II
जर कां मनुष्ये एकाग्रचित्ते I हात जोडूनी पठिले याते I
होतील त्याते किन्नर स्तविते I समीप जाईल शिवाच्या ...II३८II

पुष्पदंताचे मुखांतुन I स्तोत्र होऊन उत्पन्न I
सर्वदा करी पापनाशन I प्रिय असे सदाशिवा II
कंठस्थ करूनी लक्षपुर्वक I पठण करिता दिवसरात I
संतुष्ट होतो भूतनाथ I अंतर्बाह्य संरक्षी तो ........II३९II